BREAKING पोलीस असल्याचे सांगत वृद्धाला लुटले! बुलडाणा शहरातील घटना.. 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत एका सेवानिवृत्त वृद्धाला लुटल्याची घटना आज १० जुलै रोजी उघडकीस आली. स्थानिक विश्राम गृह परिसरात ही घटना घडली. तक्रारीवरून दोन अज्ञात भामट्या चोरट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
घटना ३ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील मच्छी लेआउट भागात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश कांबळे हे विश्रामगृहा जवळून ईपीएस पेन्शन धारकांचे आंदोलन मंडपाकडे जात होते. दरम्यान, एक अज्ञात दुचाकीस्वार व्यक्ती त्यांच्याजवळ आला. 'मी क्राईम ब्रांच मध्ये पीएसआय असल्याचे सांगत तो म्हणाला की, आम्ही काल एकाला बस स्थानकातून दोन लाख रुपये व पिस्तूल सह पकडले आहे. यानंतर त्याचा एक सहकारी तिथे आला तो देखील म्हणाला की, तुमच्या जवळील अंगठी आणि पाकीट रुमाला मध्ये बांधून ठेवा सतर्कतेसाठी आम्ही लोकांना किमती वस्तू सांभाळून ठेवा असे सांगत आहोत. यामुळे तुम्ही देखील तुमचे साहित्य रूमाला मध्ये बांधून ठेवा असे अज्ञात दुचाकीस्वाराच्या सहकारी मित्राने सांगितले. सांगितल्यानुसार, कांबळे यांनी त्यांच्याकडे असलेली दहा ग्रॅम आणि पाच सोन्याची अंगठी रुमाला मध्ये बांधून ठेवली. गाडीच्या मीटर काट्यावर कांबळे यांनी बांधलेला रुमाल ठेवला. त्यांनतर ते अनोळखी कथित पोलीस अधिकारी गाडीवर बसले आणि म्हणाले की, चला आपल्याला माझ्या ऑफिसला जायचे आहे. आणि जोरात गाडी चालवून तहसील कार्यालयाच्या दिशेने निघून गेले. प्रकाश कांबळे हे देखील त्यांच्यामागे निघाले परंतु गाडी जोरात पुढे निघून गेली.
दोघेही पुढे आढळले नाही. यांनतर त्यांनी जवळचा बांधलेला रुमाल उघडून बघितला असता त्यामध्ये सोन्याची अंगठी आणि पाकीट दिसून आले नाही. यावरून आपली फसवणूक होऊन हातचलाखीने दोघा अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचे प्रकाश कांबळे यांच्या लक्षात आले. यांनतर दोन ते तीन दिवस त्यांनी स्वतःच शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अज्ञात भामट्या चोरट्यांचा पत्ता लागला नाही. यामुळे अखेर आज १० जुलै रोजी शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव खवले करीत आहेत.