पोरगी द्यायला नाकार... पोराकडल्या मंडळींचा पोरीच्या घरी धिंगाणा! लाठ्या काठ्या चालल्या.... खामगाव तालुक्यातील आवारची घटना! घराशेजारीच जमवत होते सोयरीक...

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील आवार गावात दोन कुटुंबात राडा झाला. मुलगी दिली नाही म्हणून दोन कुटुंबात वाद झाल्याचे समोर येत आहे. त्यापैकी एका कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार करणारे मुलीकडील मंडळी आहेत..
प्राप्त माहितीनुसार आवार येथील काळे आणि टाले कुटुंबात हा वाद झाला. रामेश्वर नामदेव काळे (५०) यांनी त्यांच्या पुतणीचे लग्न धीरज प्रकाश टाले याच्याशी करायला नकार दिला होता. या नकाराचा टाले कुटुंबाला खूप राग आला. यातून दोन्ही कुटुंबात प्रचंड वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी प्रकाश किसन टाले, धीरज प्रकाश टाले आणि रोशन प्रकाश टाले हे सर्व तक्रारदाराच्या घराशेजारीच राहतात. टाले कुटुंबियांनी काळे कुटुंबाकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र काळेंनी प्रस्ताव नाकारल्याचा राग टाले कुटुंबाच्या मनात होता.
याच कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी तक्रारदार, त्यांचा भाऊ आणि सून यांना काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.