बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल ! माता न तू वैरिणी! अनैतिक संबंधात अडसर म्हणून स्वतःच्या मुलाची सुपारी देऊन केला खून..लोणार तालुक्यातील संतापजनक घटना
Apr 11, 2026, 09:40 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आई, माय –माऊली.. या नात्याची काय महती गावी.. जगात आई पेक्षा कुणी थोर नाही..मात्र या नात्याला काळिमा फासणारी घटना लोणार तालुक्यातील वढव गावात उघडकीस आली आहे. स्वतःच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून एका लफडेखोर बाईने स्वतःच्या मुलाची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खुनाची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली.. हिंगोली पोलिसांनी तपासाअंती मृतकाच्या आईसह तिघांना अटक केली आहे.. ही घटनाच तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे.. बुलडाणा जिल्ह्यातील वढव (ता. लोणार) येथील रहिवासी सचिन रामकिशन राजगुरू (वय ३०) याचा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात निर्घृण खून करण्यात आला. मृतक सचिन राजगुरू याच्या वडिलांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडिलोपार्जित शेती ठोक्याने देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. काही वर्षांपूर्वी सचिनचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्याला साडेतीन वर्षांची संचिता ही मुलगी असून, सचिन, त्याची आई लिलाबाई राजगुरू आणि मुलगी असे तिघे एकत्र राहत होते. कौटुंबिक कारणांमुळे सचिन मानसिक तणावाखाली होता.
दरम्यान, राशन दुकानदार रामदास विश्राम तनपुरे याचे लिलाबाई राजगुरू हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. या संबंधांना सचिन अडथळा ठरत असल्याने त्याला कायमचे दूर करण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी नरेश साबन्या पवार (रा. वडद) याला २५ हजार रुपयांची सुपारी देण्यात आली.
दगडाने ठेचले...
घटनेच्या दिवशी रामदास तनपुरे आणि नरेश पवार यांनी सचिनला मोटारसायकलवरून सेनगाव हद्दीत नेले. तेथे त्याला मद्यधुंद करून उमरदरी पाटीजवळ दगडाने डोके ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ओळख पटू नये म्हणून मृतदेह नाल्यात फेकून आरोपी फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सचिनचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बाब उघड झाली.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मृताच्या हातावरील टॅटूच्या आधारे पोलिसांनी ओळख पटवली. स्थानिक गुन्हे शाखा आणि सेनगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या कटाचा पर्दाफाश केला.
पोलीस अधीक्षक डॉ. निलाभरोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे आणि परीविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अनैतिक संबंधासाठी जन्मदात्या आईनेच मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याची ही घटना समाजमन सुन्न करणारी ठरली असून, या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.