धाड पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; हुंडाई कारमधून बकऱ्या चोरणारी टोळी जेरबंद
Mar 12, 2026, 15:25 IST
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बकरी चोरट्यांच्या टोळीचा धाड पोलिसांनी चित्रपटाला साजेश्या थरारक कारवाईत पर्दाफाश केला. हुंडाई कारमध्ये बकऱ्या भरून पळ काढणाऱ्या नाशिक आणि मुंबई येथील दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी बुधवारी (दि.११) पाठलाग करून अटक केली.
धाड (ता. बुलढाणा) येथील टिपू सुलतान चौकातून शेख सलीम यांची सुमारे १२ हजार रुपये किमतीची बकरी अज्ञात चोरट्यांनी हुंडाई कार (क्र. MH-14-BR-6619) मध्ये टाकून पळवून नेली. ही कार बुलढाणाच्या दिशेने वेगाने जात असल्याची माहिती धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल केली.
ठाणेदार प्रताप भोस यांनी स्वतःच्या वाहनाने तर पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार कृष्णा चव्हाण, रवींद्र बराटे, राजू माळी व चालक नितीन इंगळे यांच्या पथकाने शासकीय वाहनातून चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. याच वेळी बुलढाणा येथील ‘दामिनी पथकाला’ धाड रोडवर नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. एका बाजूने पोलिसांचा पाठलाग आणि दुसऱ्या बाजूने नाकाबंदी झाल्याने चोरटे अक्षरशः कात्रीत सापडले.
अखेर बुलढाणा येथील धाड नाक्यावर पोलिसांनी संशयित वाहनाला घेराव घालत थांबवले. कारची झडती घेतली असता पोलिसांनाही धक्का बसला. आलिशान कारमध्ये तब्बल चार बकऱ्या आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ शेख फिरोज शेख लियाकत (वय ४५, रा. सादिक नगर, वडाळा, नाशिक) आणि आरिफ अब्दुल शेख (वय ३२, रा. माहीम झोपडपट्टी, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले.
कसून चौकशीदरम्यान आरोपींनी धाड येथून एक बकरी चोरी केल्याची कबुली दिली, तर उर्वरित तीन बकऱ्या भोकरदन आणि सिल्लोड परिसरातून चोरल्याचेही उघड झाले. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून परिसरातील इतर चोरीच्या घटनांमध्येही त्यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी शेख सलीम यांच्या तक्रारीवरून धाड पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी धाड परिसरातून १० बकऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या टोळीच्या अटकेमुळे त्या प्रकरणाचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.