'माझ्या घरचे आल्यानंतरच बस धकवा', म्हणत बस चालकाला केली मारहाण; पारखेडजवळील घटना; माय-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल!

 
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : 'माझे घरचे आल्यानंतरच बस पुढे न्या,' असे म्हणत एका प्रवाशाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना पारखेड फाट्याजवळ घडली. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून प्रवासी व त्याच्या आईविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव-मेहकर मार्गावरील बस क्रमांक एमएच-२०-बीएल-४१७३ ही १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता पारखेड फाट्यावर पोहोचली. त्यावेळी एका तरुणाने बससमोर आडवा येत बस अडविली. बसच्या काचांवर हात ठेवत तो मोठ्याने ओरडू लागला की, "जोपर्यंत माझे घरचे येत नाहीत, तोपर्यंत बस पुढे जाणार नाही." बसचालकाने त्याचे छायाचित्र मोबाइलमध्ये घेण्याचा प्रयत्न करताच, संतप्त तरुण थेट कॅबिनमध्ये घुसला. "फोटो कशाला काढतोस? माझे घरचे येईपर्यंत बस हलवायची नाही," असे म्हणत त्याने चालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर शर्टची कॉलर पकडून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत चालकाच्या डाव्या हाताला बसच्या पत्र्यामुळे दुखापत झाली. दरम्यान, आरोपीची आईदेखील बसमध्ये चढली आणि तिनेही चालकाला मारहाण केली.

या वेळी प्रवासी बंटी मोरजानी, रहीम खान, विठ्ठल बघे आदींनी धाव घेत माय-लेकांच्या तावडीतून बसचालकाची सुटका केली.
या प्रकरणी बसचालक मंगलसिंग भावसिंग जोहरे (वय ४६, रा. खामगाव आगार) यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलिसांनी आरोपी तुषार अर्जुन राठोड व त्याची आई (रा. पारखेड, ता. मेहकर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास जानेफळ पोलिस करीत आहेत.