शेगावमध्ये गेस्ट हाउसमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांचा छापा, दोन जणांविरुद्ध गुन्हा
पीडित मुलींची सुटका, शहरात खळबळ...
Oct 14, 2025, 12:51 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील शिवहरी गेस्ट हाउसमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर शेगाव शहर पोलिसांनी शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) सायंकाळी धडक कारवाई करत छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी काही महिलांना व तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली असून, गेस्ट हाउस मालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिवहरी गेस्ट हाउस, शेगाव येथे महिलांकडून देहव्यापार चालविला जात असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून छापा टाकला. छाप्यामध्ये गेस्ट हाउसमध्ये काही महिलांचा व ग्राहकांचा सहभाग आढळून आला.
प्राथमिक तपासात उघड झाले की, गेस्ट हाउस मालक विजय हरिभाऊ उमाळे (वय ३८, रा. शिवहरी गेस्ट हाउस, शेगाव) हा महिलांकडून देहव्यापार करून घेत होता आणि ग्राहकांकडून थेट पैसे स्वीकारत होता.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजय उमाळे, श्रीकृष्ण नारायण गवई (वय २०, रा. बालाजी फैल) व ग्राहक अजय साहेबराव शिंदे (वय २५, रा. शिवणी आरमाळा, ता. देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर शेगाव शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.