लग्नासाठी दबाव, फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् घरात घुसून गैरवर्तन! देऊळगाव राजात ३२ वर्षीय महिलेची तक्रार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान प्रकाश जायभाये (रा. किन्ही ताठे, ता. जाफ्राबाद, जि. जालना) याच्याविरुद्ध महिलेने तक्रार दिली आहे. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी महिलेच्या आईच्या घरी आला होता. त्यावेळी लग्न करण्यासाठी दबाव आणत, लग्नास नकार दिल्यास महिलेचे फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारित करून तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याचवेळी त्याने महिलेशी गैरवर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.घरातील हा प्रकार सुरू असताना महिलेची आई मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली. मात्र, आरोपीने तिलाही धक्काबुक्की केली आणि मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, आरोपी त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा महिलेच्या आईच्या घरी आल्याचा आरोप आहे. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने जिवंत गाडून टाकण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच, स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून त्यासाठी कुटुंबीयांना जबाबदार धरण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी घरात अनधिकृत प्रवेश, महिलेचा विनयभंग आणि धमकी देण्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.