मेहकरच्या वाटिका चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की; तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान शहरातील वाटिका चौक परिसरात घडली.

या प्रकरणात फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी श्रीराम चिमण (वय ३०, रा. पोलीस स्टेशन मेहकर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, नमूद वेळेत ते शासकीय कर्तव्य बजावत असताना होंडा शाइन (क्रमांक MH-28-BH-6668) या मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून आरडाओरड करत जाणाऱ्या तिघांना त्यांनी हटकले. यावेळी आरोपी मुजाहीद मुकद्दर कुरेशी (वय १८, रा. इमामवाडा, मेहकर) याने पोलिसांच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच शेख बिलाल शेख अयाज (वय १८, रा. इमामवाडा, मेहकर) आणि रेहान वाजिद कुरेशी (वय १८, रा. माळीपेठ, मेहकर) यांनी शिवीगाळ करून गोंधळ घातला.
साक्षीदारांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसून त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांच्या अंगावर धावून जाऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीच्या तोंडी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी कायमी गुन्हा क्रमांक १२३/२०२६ नोंदविला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २९६, ११५(२), ३(५) तसेच मोबाका कलम १२८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोहेका नारायण मांटे यांनी केली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल करीत आहेत.