चिखलीत पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई! सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या; ४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरात रात्रीच्या सुमारास गस्त घालत असलेल्या चिखली पोलिसांच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले आहे. ही कारवाई २२ ऑगस्टच्या मध्यरात्री संभाजीनगर परिसरात करण्यात आली.

चिखली पोलिसांचे पेट्रोलिंग पथक रात्री गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून ईश्वर प्रकाश धनवटे (२५, रा. गोरक्षणवाडी, चिखली) हा संशयित व्यक्ती पिस्तूल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.दरम्यान, रात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास संभाजीनगर भागातील गोपाल किरणा दुकानासमोर ईश्वर धनवटे हा पोलिसांच्या पथकाला आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता कमरेच्या उजव्या बाजूला पिस्तूल आढळून आले.

पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेऊन तपासणी केली असता ते देशी बनावटीचे असल्याचे समोर आले. काळ्या रंगाची प्लास्टिकची ग्रिप असलेल्या या पिस्तुलाच्या हँडलवर दोन्ही बाजूंना लोखंडी पंचकोनी स्टाईलची रचना असून, मॅग्झिनसह त्याची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अन्वये चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे.

ही कारवाई डी.बी. पथकाने केली. पोलीस पथकात पोहेकॉ अमोल गवई, अजय इटवा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, निलेश सावळे, पोहेकॉ ललिता खरात आणि पोहेकॉ रूपाली उगले यांचा सहभाग होता.रात्रीच्या गस्तीमुळे शस्त्रासह संशयित पोलिसांच्या हाती लागल्याने शहरातील गुन्हेगारी हालचालींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.