अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांचा छापा; ५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त:
एमआयडीसी पोलिसांची कारवाई; चारचाकीसह प्रतिबंधित पानमसाला जप्त...
Feb 27, 2026, 10:44 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अवैधरित्या गुटखा वाहतूक केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाणे मलकापूर यांच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी कारवाई करत सुमारे ५ लाख ८७ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक चारचाकी वाहन बऱ्हाणपूरकडून मुक्ताईनगरमार्गे मलकापूरकडे अवैधरित्या गुटखा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार दसरखेड टोलनाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
यावेळी सिल्व्हर रंगाची स्वीफ्ट डिझायर (एमएच १२ एफएफ ७१४४) संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ‘विमल’ पान मसाला आढळून आला. वाहन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणून सखोल तपासणी केली असता केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू असा विविध कंपन्यांचा सुमारे २ लाख ८७ हजार ५६८ रुपयांचा माल मिळून आला. तसेच ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख ८७ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग कर्ता वसावे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मंगलदास लक्ष्मण पवार (वय ४०, रा. संताजी नगर, मुक्ताईनगर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार नरेंद्र पेन्दोर करीत असून ही कारवाई एएसआय टेकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश बावने, पोलीस कॉन्स्टेबल वरखडे व होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केली.