बुलढाण्यात पोलिसांची तत्परता; १४ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला; मध्यरात्रीच पोहोचले पोलीस...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा): एका सजग नागरिकाने ‘डायल ११२’ वर दिलेल्या गोपनीय माहितीमुळे बुलढाणा शहर पोलिसांनी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश मिळवले. खामगाव रोडवरील माळविहीर शिवारातील संतनगरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यातील बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

पोलिसांना १४ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विवाह १५ मे रोजी लावून देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाइननेही तातडीने पोलिसांकडे मदतीची मागणी केली. माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांचे पथक आणि चाईल्ड हेल्पलाइनचे अधिकारी मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झाले.

संतनगरी परिसरात विवाहाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत विवाह थांबवला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे, महिला पोलिस हवालदार अनिता आराख, पोलिस नाईक सतीश पवार आणि विकास सुरडकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

 समुपदेशनातूनही मिळतेय यश

पोलिस प्रशासन आणि चाईल्ड हेल्पलाइनच्या संयुक्त प्रयत्नांतून गेल्या महिनाभरात सहा बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. विशेष म्हणजे, अनेक प्रकरणांमध्ये लग्न लागण्यापूर्वीच संबंधित कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सामाजिक जागृतीद्वारे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात असून, ही बाब सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे.