तहसीलदारांवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर रेती माफियांवर पोलिसांचा दणका; अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त! ४ टिप्परमधील २४ ब्रास रेती जप्त; चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल...

 
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गौण खनिजाची चोरी आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी मोठी कारवाई केली. चार टिप्परमधून वाहतूक केली जात असलेली तब्बल २४ ब्रास रेती जप्त करण्यात आली असून, वाहनांसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी १० लाख ८४ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, अंढेरा हद्दीत मागील महिन्यात रेती माफियांकडून तहसीलदारांवरच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आजची ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गौण खनिजाची चोरी व वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत चार टिप्पर ताब्यात घेतले. या टिप्परमध्ये एकूण २४ ब्रास रेती आढळून आली. वाहनांसह रेती असा एकूण १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच गौण खनिज अधिनियमातील कलम २१(१), २१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि खामगावचे अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आली.

कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, PSI प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, विजय वारुळे, पोकॉ. अमोल अंभोरे, मंगेश सनगाळे, अमोल वनारे आणि मनोज खरडे यांच्या पथकाचा सहभाग होता.

अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई असल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.