डायल 112 वर खोटी माहिती देत पोलिसांची धावपळ उडवली; ‘दारूच्या नशेत’ पोलिसांना चुकीच्या ठिकाणी पाठवणाऱ्यावर मेहकर पोलिसांची कारवाई!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या डायल 112 या यंत्रणेचा गैरवापर करीत पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेहकर शहरातील माळीपेठ येथील गणेश तुकाराम राजत (वय 31) याने डायल 112 वर फोन करून मेगा हॉटेल, डोणगाव रोड येथे काही लोक भांडण करीत असल्याची खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12.47 वाजता गणेश राजत याने डायल 112 वर कॉल करून मेगा हॉटेल, डोणगाव रोड, मेहकर येथे चाकू घेऊन काही लोक भांडण करीत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच मेहकर पोलिस ठाण्यातील नाईट अधिकारी सपो अशोक गाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी सुनील देशमुख व चालक पोलीस शिपाई शिवाजी चिम यांच्या पथकाने शासकीय वाहनाने घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना कॉल करणारा गणेश राजत हाच व्यक्ती आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. त्याने घटनास्थळी कोणतेही भांडण झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे डायल 112 वर करण्यात आलेला कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गणेश तुकाराम राजत याच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात अप.क्र. 575/26 अन्वये BNS कलम 217 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 85(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपत्कालीन क्रमांकाचा गैरवापर टाळण्याचे पोलिसांचे आवाहन

डायल 112 ही नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिस, अग्निशमन, वैद्यकीय मदत आदी सेवा तातडीने मिळवून देण्यासाठी शासनाने कार्यान्वित केलेली यंत्रणा आहे. चोरी, घरफोडी, भांडण, कुणावर हल्ला, महिलांशी संबंधित धोका, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार, बालकांच्या सुरक्षेशी संबंधित घटना किंवा आग लागणे अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी या क्रमांकाचा वापर करणे अपेक्षित आहे.
मात्र खोटी माहिती देणे, विनाकारण वारंवार कॉल करणे किंवा आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणे यामुळे प्रत्यक्ष गरजू व्यक्तीला मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी डायल 112 चा वापर केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच करावा, असे आवाहन मेहकर पोलिसांनी केले आहे.