लग्नासाठी फाेडले घर, आता पाेलिसांनी केले जेरबंद; पिंपळगाव साेनारा येथील घरफाेडीचा साखरखेर्डा पाेलिसांनी लावला छडा,; मुद्देमालही केला जप्त...
Oct 11, 2025, 13:19 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लग्नसाठी पैसे जुळवण्याच्या उद्देशाने पिंपळगाव साेनारा येथे घरफाेडी करणाऱ्या चाेरट्यास साखरखेर्डा पाेलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून पाेलिसांनी २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास त्र्यंबक ठोसरे हे ८ ऑक्टोबर रोजी पत्नीसह शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी गेले असता त्यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख ३९ हजार रुपये असा एकूण सुमारे २.५० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला.
या घटनेनंतर ठोसरे यांनी साखरखेर्डा पोलिसांत चौघा बांधकाम मजुरांविरुद्ध संशय व्यक्त केला. ठाणेदार गजानन करेवाड यांनी तत्काळ दोन पथके तयार करून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत शेख अक्रम ऊर्फ गणेश जगताप (वय २४, रा. साखरखेर्डा) याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने लवकरच होणाऱ्या लग्नाच्या खर्चासाठी चोरी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.