घरातच टाकला पेट्रोलपंप!
सुरू केला पेट्रोलचा काळाबाजार? पोलिसांचा अंजनी बु. येथे धाडसी छापा; २७० लिटर पेट्रोलसह ₹३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

 
 डोणगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे घरातूनच बेकायदेशीररित्या पेट्रोलचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे डोणगाव पोलिसांनी शनिवारी (२६ जुलै) टाकलेल्या धाडीत तब्बल २७० लिटर पेट्रोल, आठ प्लास्टिक कॅन आणि एकूण ₹३४ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVT 

पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, अंजनी बु. (ता. मेहकर) येथील भागवत रामदास लाड (वय २५) यांच्या घरावर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान कोणतीही वैध परवानगी न घेता विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा करून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी २७० लिटर पेट्रोलआणि आठ प्लास्टिक कॅन असा एकूण ₹३४ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात परवानगीशिवाय सुरू असलेल्या इंधन विक्रीविरोधात पोलिसांनी आता अधिक कठोर भूमिका घेतली असून अशा बेकायदेशीर इंधनसाठ्यांवर सातत्याने धडक कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा डोणगाव पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई ठाणेदार गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.