स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; दुचाकी आणि बॅटरी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या..

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बॅटरी आणि दुचाकी चोरांना पकडून त्यांच्या मुस्क्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. दरम्यान, बॅटरी चोरीच्या प्रकरणातील दोघा आरोपींना अकोला जिल्ह्यातील चान्नी चतारी येथून उचलल्याची माहिती आहे.

सिंदखेडराजा पोलीस स्टेशन हद्दीतून बॅटरी चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. २९ जून रोजी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर घटनेचा तपास करीत तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा निष्पन्न झाला. या चोरीच्या घटनेतील आरोपी अकोला जिल्ह्यातील चान्नी चतारी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. तेथून त्यांना यशस्वीरीत्या पकडण्यात आले. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना सिंदखेडराजा पोलीसांकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले. गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस गजानन माळी, हवालदार दिगंबर कपाटे, शेजोळ यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. तसेच खामगाव शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल करीत पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. त्याचाकडून ५० हजार रुपये किमतीची शाईन कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याला खामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष विष्णू रावळकर (रा. कुऱ्हा) असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे, हवालदार पुरुषोत्तम आघाव, पोलीस नाईक गणेश पाटील, जमादार गजानन गोरले या पथकाने ही कामगिरी केली.