आईवडील कामावर गेले, 'ती' घरी एकटीच होती ! घरी आल्यावर आईवडिलांची शोधाशोध.. दिवसभर शोधली, तरी पत्ता लागला नाही! 'त्याने' पळवून नेल्याचा वडिलांना संशय, बुलढाणा शहरातील घटना.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत तिला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी तक्रारीत व्यक्त केला. याबाबत काल ९ जून रोजी मुलीच्या वडिलांनी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिली. यावरून संशयित आरोपी शैलेश रमेश वानखेडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना ८ जूनची आहे. पळवून नेलेली मुलगी अल्पवयीन असून तिचे वय १७ वर्ष इतके आहे. तिला मोठी बहीण आहे. तिचे लग्न झाल्याने ती पतीसह बाहेरगावी राहते. पिडीत अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसह बुलढाण्यातील एका नगरात राहते. दरम्यान, ८ जून रोजी तिचे आई-वडील दोघेही कामाला गेले होते.
मुलीची आई कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी घरी दिसून आली नाही. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी तिचा नातेवाईकांकडे व मैत्रिणीकडे शोध घेतला. एक दिवस उलटून गेल्यानंतर देखील मुलीचा पत्ता लागला नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी ९ जून रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी शैलेश वानखेडे यानी मुलीला फुस लावून पळवून नेले असे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी शैलेश वानखेडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांचाही शोध सुरू आहे.