मोताळा तालुक्यात खळबळ; बोराखेडी शिवारात १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील बोराखेडी शिवारात १७ वर्षीय युवतीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राथमिक माहितीनुसार, बोराखेडी शिवारातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या नदीपात्रात संबंधित युवतीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन विविध नमुने संकलित केले आहेत. प्राथमिक पाहणीत मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. मृत्यूमागील कारणांबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे असून प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहे