संतापजनक: नवऱ्याकडूनच बायकोला "धंद्यांवर" बसवण्याचा प्रयत्न! नकार दिल्यावर दोन दिवस घरात कोंडून बलात्कार! आठ जणांविरुद्ध जानेफळात गुन्हा...
Jun 20, 2025, 08:01 IST
जानेफळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पती, सासू आणि नणंद यांनीच एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर अमानुष वागणूक करत तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले आणि नकार दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार करत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पीडितेला दोन दिवस घरात डांबून ठेवण्यात आले. या धक्कादायक प्रकाराची नोंद जानेफळ पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी तिघांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेवर २०१५ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत पती, सासू आणि नणंद यांनी सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला. त्यांनी तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. मात्र, महिलेने नकार दिल्यावर तिच्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार करण्यात आला.
या त्रासाला आणखी गंभीर वळण मिळाले तेव्हा सासू व नणंद यांच्या सांगण्यावरून आरोपी शाम मधुकर मेतकर (वय ३६, रा. जानेफळ), शेख मोहम्मद शेख शब्बीर (वय ४५, रा. वरवंड, ता. मेहकर) आणि इतरांनी महिलेवर बलात्कार केला. यावेळी तिच्यावर मारहाणही करण्यात आली आणि दोन दिवस जबरदस्तीने घरात डांबून ठेवण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शाम मधुकर मेतकर, शेख मोहम्मद शेख शब्बीर आणि पीडितेची नणंद या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.