संतापजनक! १२ वर्षीय चिमुकलीवर तिघांचा अत्याचाराचा प्रयत्न; घरासमोरून उचलून शेतात नेले, एकाने पाय धरले, दुसऱ्याने हात, तिसऱ्याने...! चिखली तालुक्यातील खळबळजनक घटना!

दुसऱ्या गटाचीही पिडीत मुलीच्या वडिलांविरुद्ध विनयभंगाची तक्रार, महिला म्हणे ,तो घरात घुसला अन्...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील एक गावातून अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. एका १२ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला, तिघा नराधमांनी हे कांड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पिडीत चिमुकलीवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून चिखली तालुक्यातील एका गावातील तिघांविरुद्ध पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार घटना २५ मे रोजी सायंकाळची आहे. "त्या" दिवशी गावातील वीज गेलेली होती. पिडीत मुलीचे वडील चिखलीला गेले होते तर आई घरात स्वयंपाक करत होती. मुलगी त्यांच्या किराणा दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी घराबाहेर ओट्यावर बसलेली होती. त्यावेळी गावातील एक जण तिथे आला. तुझे वडील कुठे गेले असे विचारले असता चिमुकलीने ते चिखलीला गेले असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने चिमुकलीचे तोंड दाबून उचलले आणि पाठीमागे असलेल्या शेतात नेले. शेतातील बोरजवळ दुसरा आणि तिसरा आधीपासूनच हजर होते. एकाने चिमुकलीचे दोन्ही पाय दाबून धरले, दुसऱ्याने हात दाबून धरले एकाने चिमुकलीची पॅन्ट सोडण्याचा प्रयत्न केला,त्याआधी त्याने चुकीच्या ठिकाणी वाईट उद्देशाने स्पर्श केला, यावेळी चिमुकलीने सर्व ताकद एकवटून घटनास्थळी उचलून आणणाऱ्या आरोपीच्या 
हाताला जोरात चावा घेतला व जोर जोरात ओरडली, त्याचवेळी लाईट आल्याने तिघेही नराधम तिथून पळत सुटले. मुलीच्या आईने चिमुकलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेताच्या दिशेने धाव घेतली असता तिघे आरोपी पळतांना दिसले तर चिमुकली शेतातील बोरजवळ बसलेली दिसली. मुलीच्या आईने चिमुकलीला विचारणा केल्याबद्दल वरील सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने चिमुकलीला घेऊन पतीसह तातडीने चिखली पोलीस स्टेशन गाठले. यावेळी मुलीला चक्कर आल्याने तिला तातडीने चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तिथून डॉक्टरांनी तिला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातच पोलिसांनी पिडीत मुलीच्या आईचा जबाब नोंदवला असून त्यावरून तिघा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
   तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे, आरोपी मोकाट...
  दरम्यान गुन्ह्यात पोस्कोसह ॲट्रॉसिटीचे कलम असल्याने सदर गुन्ह्याचा तपास हा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे आहे. गुन्हा दाखल होऊन आज,२९ मे ला तिसरा दिवस उजाडला असला तरी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
  पिडीत चिमुकलीच्या वडिलांविरूद्धही महिलेने दिली विनयभंगाची तक्रार..
  दरम्यान २७ मे रोजी तिघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर २८ मे रोजी पिडीत चिमुकलीच्या वडिलांविरुद्ध वरील घटनेतील आरोपीच्या ४५ वर्षीय पत्नीने विनयभंगाची तक्रार दिली. त्या महिलेने घटना २५ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताची असल्याचे म्हटले आहे. महिला घरी एकटीच स्वयंपाक करीत असताना आरोपी घरात घुसला, मुलगा कुठे आहे असे म्हणत त्यांच्या कामाच्या विषयावरून शिवीगाळ केली. महिलेच्या अंगाशी झटापट केली, हात धरून जवळ ओढले तेवढ्यात महिलेचे पती घरी आले,त्यांनी पत्नीची सुटका केली. यावेळी आरोपीने महिलेच्या पतीला देखील मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिलेने घराच्या दरवाज्याजवळ लावलेला दगड आरोपीच्या तोंडावर फेकून मारला त्यामुळे आरोपीचे ओठ फाटून त्यातून रक्त निघाले. आरोपीने पळून जाताना महिलेच्या पतीला जीवाने मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर पिडीत महिलेने चिखली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले, तब्येत बरी झाल्यानंतर २८ मे रोजी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
(वाचकांसाठी महत्वाचे: सदर घटनेत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. बाल लैंगिक अत्याचार, विनयभंग अशा घटनांत पीडितेची ओळख जाहीर होऊ द्यायची नसते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही घटनांतील आरोपींची नावे देखील टाळले आहे)