कांद्याच्या वावरात अफूची शेती! धोत्रा नंदईत "एलसीबी"ची धाड! तब्बल ४४ लाखांचा माल जप्त...
Mar 31, 2026, 12:08 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात अवैधरित्या अफूची लागवड करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व अंढेरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ४४ लाख ५३ हजार रुपयांच्या किमतीचा अफूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व श्रेणिक लोढा (खामगाव), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ही मोहिम राबविण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ३० मार्चच्या रात्री अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम धोत्रा नंदई शिवारातील गट क्रमांक ३६८ मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी संजय तुकाराम चेके (वय ५१, रा. सरंबा, ता. देऊळगाव राजा) याने आपल्या शेतात कांद्याच्या पिकामध्ये लपवून अवैधरित्या अफूच्या झाडांची लागवड व संगोपन केल्याचे उघड झाले.कारवाईदरम्यान पोलिसांनी १११.३३ किलो वजनाची ओलसर अफू बोंडे व झाडे जप्त केली असून, त्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे ४४,५३,२०० रुपये आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांच्या नावाने तक्रार नोंदवण्यात आली. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ दिगंबर कपाटे, पोहेकॉ पुरुषोत्तम आघाव, वनिता शिंगणे, पोलिस शिपाई मंगेश सनगाळे, मनोज खरडे, सतीश नाटेकर, पूजा जाधव, समाधान टेकाळे, राजू आडवे, कैलाश ठोंबरे तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रूपेश शक्करके व त्यांच्या पथकाचा सहभाग होता.