अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अफूची शेती! वांग्याच्या वावरात लावली अफूची झाडे; स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त..
Mar 25, 2026, 17:19 IST
चिखली(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मेरा खुर्द येथे वांग्याच्या शेतीत अफूची शेती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एलसीबी पथकासह अंढेरा पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे, २४ मार्चच्या रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत जवळपास साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेरा खुर्द येथील कृष्णा रामहरी वाघमारे (२६) या शेतकऱ्यांनी वांग्याच्या शेतात अवैध रित्या अफूची लागवड केली होती. गोपनीय सूत्रांनी ही माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, टीम एलसीबी आणि अंढेरा पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली.
पथकाने छापामारी केल्यानंतर कृष्णाने लावलेल्या वांग्याच्या शेतात अफूची लागवड केल्याचे दिसून आले. अफूच्या झाडांना हिरव्या रंगाची बोंडे आलेली होती, याशिवाय झाडे परिपक्व असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी माल जप्त केला..या जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ९ लाख १८ हजार ३२० रुपये इतकी आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.