हरविलेल्या चिमुकल्यांच्या शोधासाठी बुलढाण्यात ‘ऑपरेशन मुस्कान-१४’; समाजाच्या सहभागाचे आवाहन; जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वात सर्वच पोलीस ठाण्यांतर्गंत विशेष शोध मोहिम ...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षिततेच्या छत्राखाली आणण्यासाठी बुलढाणा पोलीस दलाकडून ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ ही विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्या निर्देशानुसार व पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम दि. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत राबविली जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्हा अभिलेखावर नोंद असलेल्या हरविलेल्या (मिसींग) बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर स्वतंत्र मिसींग सेल स्थापन करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग स्तरावरही समन्वयाने कार्यवाही केली जाणार आहे.
आश्रमशाळा, बालगृहे, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भिक मागणारी किंवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने तसेच विविध ठिकाणी काम करणारी मुले यांच्याबाबत माहिती संकलित करून ती मुले हरविलेली आहेत का, तसेच मानवी तस्करीची बळी तर नाहीत ना, याची सखोल तपासणी केली जाणार आहे.
या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या मोहिमेत बालकांसाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्था, बालगृहे, बालकल्याण समिती, बाल सुरक्षा कक्ष यांचे सहकार्य घेतले जात आहे. पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद किंवा हरविलेली बालके आढळून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे दूरध्वनी क्रमांक (07262) 242400 किंवा डायल-112 वर माहिती द्यावी.
‘ऑपरेशन मुस्कान-१४’ यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव), अमोल गायकवाड (बुलढाणा), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, मिसींग सेल, अमानवीय वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत.
हरविलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी ही मोहीम समाजाच्या सहभागातूनच यशस्वी होऊ शकते, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.