श्रावण सोमवारी चिमुकल्याला सापाने घेतला चावा, जीव गेला! सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
सिंदखेडराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाळ्यात सर्पदंशाच्या अनेक घटना घडत आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील ढोरवी येथे सर्पदंश झाल्याने एका चिमुकल्याचा जीव गेला. त्याला मण्यार जातीच्या अतिविषारी सापाने चावा घेतला. शिवराज दिपक मुरकूट (९) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
Advt.👆
प्राप्त माहितीनुसार १२ ऑगस्टला श्रावण सोमवार असल्याने सकाळची शाळा होती. मात्र झोपेतून उठायला उशीर झाल्याने शिवराज शाळेत गेला नाही. सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरासमोरील सांडपाण्याच्या नाल्यावर असलेल्या धाब्यावर तो पाय लांबवून बसला होता. त्यावेळी नळीच्या बिळात असलेल्या मण्यार जातीच्या सापाने शिवराजला चावा घेतला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने बिबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथून जालना येथे उपचारासाठी जात असताना मध्येच शिवराजने प्राण सोडले. अतिशय हुशार आणि बोलका असलेल्या शिवराजच्या मृत्यमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.