पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक; १० ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास! खामगाव तालुक्यातील घटना...

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वतःला पोलिस असल्याचे भासवून ६६ वर्षीय वृद्धाची फसवणूक करत सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लांबविण्यात आल्याची घटना खामगाव शहराच्या उपनगरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोतीराम तोताराम लाहुडकार (वय ६६, रा. चिखली बु., ता. खामगाव) हे सोमवारी (दि. १७ जून) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने नांदुरा रोडवरील संतोष देशमुख यांच्या शेताजवळून गावाकडे परत जात होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून आपण पोलिस असल्याचे सांगितले. त्यांनी तपासणीच्या बहाण्याने त्यांच्याकडील बदामी आकाराची, जुनी, अंदाजे १० ग्रॅम वजनाची व ९० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी घेऊन पलायन केले.

घटनेनंतर लाहुडकार यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास डीबी पथकातील अंमलदार एचसी शेळके हे करीत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बनावट पोलिसांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.