नायलॉन मांजाने गळा चिरला… खामगावात दुचाकीस्वार गंभीर जखमी; निष्काळजीपणाचा बळी ठरताना थोडक्यात बचावला...
घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवत धाव घेतली. तातडीने जखमी युवकाला डॉ. भगतसिंग राजपूत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे ऋषभचा जीव वाचला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, त्या काही क्षणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शासनाने नायलॉन मांजावर कडक बंदी घातली असताना, तरीही शहरात चोरीछुप्या मार्गाने या मरणधार मांजाची विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वीही नायलॉन मांजामुळे निष्पाप पक्षी तडफडून मरत आहेत, पादचारी आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. तरीही प्रशासनाच्या कारवाईत ठोसपणा दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळत आहे.
आज ऋषभ वाचला… उद्या कोण?
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. नायलॉन मांजाविरोधात तात्काळ आणि कठोर कारवाई न झाल्यास अशा घटना पुन्हा घडणारच, अशी भीती व्यक्त होत आहे. निष्काळजीपणा आणि लालसेच्या बळी ठरत असलेल्या निरपराधांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.