आता समृध्दी महामार्गावर हे देखील पाप..! एका कंटेनर मध्ये ४० गोवंश, कोंबून कोंबून नेत होते कापायला; हिंदुराष्ट्र सेनेने अडवले...

 
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) एका भल्या मोठ्या कंटेनर मधून गोवंश वाहतूक होत असल्याचे हिंदू राष्ट्रसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाले. यांनतर तातडीने घटनास्थळी पोहचून तब्बल ४० गोवंशांची सुटका करण्यात आली. काल १३ जुलैच्या मध्यरात्री ही घटना समृद्धी महामार्गावरील (मेहकर नजीक) बाबुळखेड फाट्यावर घडली. कंटेनर चालकासह राजस्थानच्या तिघां विरोधात मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
   (आर जे १४ जीआर १४५५ ) क्रमांकाचा राजस्थानचा कंटेनर समृद्धी महामार्गावरील मेहकर येथून जवळ असलेल्या बाबुळखेड फाट्यावर दिसून आला आहे. यामध्ये गोवंश जनावरे कोंबून, क्रूरपणे वाहतूक होत असल्याची माहिती मेहकर येथील रहिवासी मोनु अवस्थी यांनी हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांना दिली. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी पवार यांना फोनद्वारे हे सांगितले. अवस्थी यांनी पवारांना अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ येण्याचे सांगितले. त्याठिकाणी पोहोचले असता, अवस्थी यांच्यासह इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राजस्थानच्या कंटेनरमध्ये गोवंशाची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यामुळे हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते कंटेनर अडविले. गाडीमध्ये काय माल आहे? असे कंटेनर चालकाला विचारण्यात आले. बैल घेवून चालल्याचे त्यानी सांगितले. परंतु, हिंदूराष्ट्र सेनेचे विजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंटेनर उघडून बघितला असता त्यामध्ये ४ गायी व ३६ गोऱ्हे असल्याचे दिसून आले. कोंबून व अतिशय क्रूरपणे या जनावरांची वाहतूक होत असल्याचे समजले. गुरांसाठी काहीही चारापाणी ठेवण्यात आलेला नव्हता. विजय पवार यांनी मेहकर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. कंटेनर, कंटेनर चालक व इतर दोघांना मेहकर येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद हुसेन यासीन खान (३० वर्ष), हमीद जीवा खान (४० वर्ष), आसाराम बिल अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही राजस्थान येथील टोक जिल्ह्यातील सावरिया येथील रहिवासी आहेत.