दारूसाठी पैसे दिले नाहीत; नातेवाईकावर दगडाने हल्ला! डाव्या डोळ्याजवळ मारून केले जखमी; जीवे मारण्याची धमकी, डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर वसंता बदर (४७, रा. आरेगाव, ता. मेहकर) हे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास चुलत भाऊ मोतीराम जानू बदर यांच्याकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, रस्त्यात त्यांचे नातेवाईक दीपक मुरलीधर बदर (रा. जांभरून नावजी, ता. जि. वाशिम) याने त्यांना अडवले. दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, परमेश्वर बदर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दीपक याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दगडाने त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ मारून त्यांना जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर जखमी परमेश्वर बदर यांनी उपचार घेतले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक मुरलीधर बदर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गावडे करीत आहेत.