मृत्यूचा नेम नाही! गाडीच्या इंजिन मध्ये पाणी टाकण्यासाठी उतरला अन् घात झाला....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मृत्युसाठी निमित्त लागते म्हणतात..अगदी काही क्षणापूर्वी चालता बोलता असलेला माणूस काही क्षणात निघून जातो..जळगाव जामोद येथील एका युवकाच्या बाबतीत नेमके असेच घडले. शैक्षणिक सहलीसाठी गेलेला युवक बसचे इंजिन गरम झाल्याने त्यात पाणी टाकण्यासाठी उतरला. युवकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने (कार ने) धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नजीकच्या महावितरणच्या विद्युत उप केंद्राजवळ सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास ही हृदय द्रावक दुर्घटना घडली असून सहकाऱ्यांच्या डोळ्यादेखत त्या युवकाचा जीव गेला आहे. 
शैक्षणिक सहलीतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची उभी स्कूल बसला एका भरधाव वेगात आलेली कारने जोरदार धडक दिली, या धडकेत बस समोर उभा राहून इंजिनमध्ये पाणी टाकत असलेल्या ३४ वर्षीय तरुणाला जोरदार मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोताळा-नांदुरा मार्गावरील मोताळा येथील विद्युत सबस्टेशन जवळ २३ डिसेंबरच्या रात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद येथील लईक देशमुख यांचा शिकवणी वर्ग आहे. काल रविवारी, २२ डिसेंबर रोजी सकाळी ते शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे गेले होते.त्यांनी आपल्या सोबत खाजगी संस्थेत लिपिक असलेला आपला मित्र मोहम्मद मुसअब अब्दुल जाबीर (वय ३२ वर्ष, राहणार जळगाव जामोद ,जिल्हा बुलढाणा) यालाही घेतले. रविवारी, २२ तारखेला रात्री उशिरा जळगाव जामोदकडे परत ते परतत होते. दरम्यान स्कूल बसचे इंजीन गरम झाले. यामुळे बस चालकाने नांदुरा मार्गावरील मोताळा जवळच्या विद्युत उप केंद्रा जवळ बस थांबवली. 
  चालकाने बस रस्त्याच्या खाली डाव्या बाजूला थांबविली. यावेळी मोहम्मद मुसअब खाली उतरुन इंजिन मध्ये पाणी टाकत असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने स्कूल बसला जोरदार धडक दिली.यात मोहम्मद मुसअब याला जोरदार मार लागला. त्याला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र कार्यरत डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले.
  या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात आरोपी कार चालक अखिलेश विजय चौधरी( राहणार नांदुरा, जिल्हा बुलढाणा) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती जळगाव जामोद येथे येऊन धडकताच एकच खळबळ उडाली. मृत मोहम्मद मुसअब यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.