मेहकरच्या खून प्रकरणात नवी अपडेट; तरुणाचा दगडाने ठेचून खून करणारा सापडला; दोघांच्या नात्यात तिसरा, म्हणून काढला काटा...
मेहकर पोलिसांना एमआयडीसी परिसरातील शेतात ४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता एका पुरुषाचे मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले.
मृताची ओळख राहुल भानुदास बाजड (वय २८, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) अशी पटली. घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तज्ज्ञ व डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. तपासासाठी चार स्वतंत्र पथके विविध दिशांनी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी केनवड (ता. रिसोड, जि. वाशीम) येथून ओम शामराव केनवडकर (वय ३६) याला त्याच्या शेतातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मृतक राहुल हा आरोपीच्या पत्नीस काही दिवसांपासून त्रास देत होता. वारंवार समज देऊनही तो न ऐकल्याने ३ मार्च रोजी त्याला खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात नेऊन दगडाने मारहाण करून खून केल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणी फिर्यादी संजय किसन वाघ (वय ४०, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, अशोक अवचार, उपनिरीक्षक गणेश कड, कांचन जारवाल तसेच मेहकर व सायबर पोलिस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केल्याने मेहकर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.