'आईने पैसे दिले नाहीत... अन् १६ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल! जळगाव जामोदमध्ये खळबळ'! मुलांमधली सहनशीलता संपली काय?

 
 जळगाव जामोद ( बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): आईने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून १६ वर्षीय मुलगा घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना जळगाव जामोद शहरात घडली आहे. कुटुंबीयांनी शहरभर शोधाशोध करूनही मुलगा सापडला नसल्याने अखेर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथील रहिवासी सलीना पिंडू पवार (वय ३५) या आपल्या पती व तीन मुलांसह मजुरीच्या कामासाठी जळगाव जामोद येथे वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे १ वाजता त्यांचा १६ वर्षीय मुलगा आपकीनंदन पिंडू पवार याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, "माझ्याकडे पैसे नाहीत," असे आईने सांगत पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तो नाराज झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर सलीना पवार या पती व मोठ्या मुलीसह उपचारासाठी डॉक्टरांकडे गेल्या होत्या. सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी लहान मुलीकडे आपकीनंदनबाबत चौकशी केली असता, तो त्या दरम्यान घरातून निघून गेल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी जळगाव जामोद शहरात सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही मागमूस लागला नाही.

तक्रारीनुसार, आपकीनंदन हा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला असून त्याने अंगात हिरव्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट आणि पायात चप्पल घातली होती. त्याची उंची सुमारे पाच फूट असून रंग सावळा आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी सलीना पवार यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला आहे. मुलाबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.