सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेळ जाळला; राख व अस्थि फेकल्या नदीत; खामगाव तालुक्यातील राहुड येथील घटना...
माहितीनुसार, रोशन संजय इंगळे (वय ३६) धाकटा भाऊ चेतन संजय इंगळे (वय ३५) याचा खून केला. या कृत्यासाठी त्याने खामगाव येथील महाकाल चौकात राहणाऱ्या रवी देवीदास राऊत (वय ३६) याची मदत घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
२५ फेब्रुवारीपासून चेतन बेपत्ता होता. गावात चर्चेला उधाण आल्याने पोलीस पाटलांनी संशय व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार भागवत मुळीक व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. संशयाच्या आधारे रोशन इंगळे याला ताब्यात घेण्यात आले, तसेच रवी राऊत यालाही अटक करण्यात आली. तपासात उघड झाले की, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी स्वतःच्या शेतात चेतन याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी लाकडे गोळा करून मृतदेह जाळण्यात आला. तसेच अस्थी व राख नदीत फेकून देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही घटना समाजासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.