मर्डर...! बुलडाणा जिल्ह्यातही वाढतेय गुन्हेगारी; यंदाच्या वर्षांत ४० मर्डर; दोन लेकी अत्याचार करून जाळून मारल्या; आरोपी अद्यापही मोकाटच...घटना वाचून संताप अनावर होईल...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड प्रकरण गाजत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी सर्वच स्थरातून होत आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारी मध्ये बुलढाणा जिल्हा सुद्धा मागे नसल्याचे चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या वर्षांत ४० मर्डर झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.यातील ३८ मर्डर प्रकरणाचा सुगावा लागलेला असला तरी २ खून प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. एवढेच काय ज्या लेकींवर अत्यंत क्रूर अत्याचार करून मारून टाकण्यात आले, पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे मृतदेह जाळण्यात आले त्या लेकिंची ओळख देखील पोलिसांना पटवता आलेली नाही...या दोन्ही घटना मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात घडलेल्या आहेत..
  २३ जानेवारी २०२४ च्या पहाटे अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील असोला शिवारात राजवाडा ढाब्यामागे अर्धवट जळलेल्या नग्न अवस्थेतील तरुणीचा मृतदेह सापडला होता. तत्कालीन एसपी सुनील कडासने तात्काळ घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांच्या तपासणीत तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे तसेच डोक्यात दगड टाकल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणीला जाळले होते.
तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळले असावे असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे होते..मात्र एवढे गंभीर प्रकरण होऊन देखील त्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत..तरुणीचा चेहरा जळालेला असल्याने त्या तरुणीची ओळख देखील पटवणे पोलीस यंत्रणेला जमले नाही. कदाचित या घटनेतील आरोपी मोकाट असल्याने याच प्रकरणाचा बोध घेऊन अशीच एक निर्दयी घटना नराधमांनी किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत घडवून आणली. ही घटना ३० मे २०२४ रोजी सिंदखेडराजा ते किनगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी शिवारात गायके ढाब्यामागे उघडकीस आली. या घटनेत निर्दयी आरोपींनी २० ते २५ वर्षे वयोगटातील तरुणीची गळा चिरून हत्या केली. तरुणीच्या डाव्या पायाचा ६ बोटे होती. त्यावरून ओळख पटेल म्हणून निर्दयी आरोपींनी तरुणीच्या पायाची बोटे कापली. नंतर तरुणीला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, यात तरुणीचा मृतदेह अर्धवट जळाला होता. पोलिसांनी मृतक तरुणीची शोधपत्रिका प्रकाशित केली मात्र मृतक तरुणी कोण? कुठुन आली? तिला कुणी मारले याचा उलगडा पोलिसांना ६ महिने उलटून देखील झालेला नाही. मात्र दुर्दैवाने या दोन प्रकरणातील लेकिंना न्याय कधी मिळेल? हा प्रश्न कुणीही उपस्थित करतांना दिसत नाही. कारण त्या लेकी सध्यातरी "बेवारस" आहेत. या प्रकरणातील आरोपी जर मोकाटच राहिले तर अशा घटना वारंवार होतील, आरोपींची हिंमत वाढेल एवढे मात्र नक्की....