शेगावात चोरट्यांचा मध्यरात्री हैदोस; मेडिकलसह तीन दुकाने फोडली, १२ हजारांचा मुद्देमाल केला लंपास, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !
Sep 24, 2025, 11:08 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील गुणव मेडिकलसह इतर दोन दुकानांची शटर तोडून सुमारे १२,५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असून ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शैलेश सुरेशचंद्र गोयनका (वय ४५, रा. धनुका कंपाउंड, शिवनेरी चौक, शेगाव) यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराच्या तळमजल्यावर गोयनका स्किन केअर हॉस्पिटल असून समोर गुणव मेडिकल आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ते खाली आले असता सीसीटीव्ही कॅमेरा तुटलेला आढळला.
शेजारील नागपाल यांच्या घरावरील सीसीटीव्ही तपासला असता ३ ते ४ अज्ञात इसम पांढऱ्या इको गाडीसह दिसले.
चोरट्यांनी प्रथम गोयनका यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तोडून मेडिकलचे शटर उचकटले व आत प्रवेश केला.
तेथून व्हिजन कंपनीचा कॅमेरा (किंमत ₹२,०००), तर जयंत पुरुषोत्तम नावकार यांच्या दुकानातून फिलिप्स कंपनीचे होम थिएटर (किंमत ₹५,०००) व गल्ल्यातील रोख ₹४,०००, तसेच संजय रामकृष्ण बडे यांच्या मेडिकलमधून रोख ₹१,५०० असा एकूण ₹१२,५०० किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३४(१), ३२४(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.