‘सर कटी लाश’ प्रकरणाचा तपास मेहकरच्या SDPO संतोष खाडेंकडे; शिवानी जिवंत निघाल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान...
मात्र, २६ मे रोजी या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. कथित मृतक शिवानी कलमेकर ही मध्य प्रदेश पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर झाली. त्यामुळे पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या. शिवानीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तिचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांची तुरुंगातून सुटका करावी लागली.
या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेची मोठी नाचक्की झाली असून, जबाबदारी निश्चित करत दोन पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक (PSI) आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र, यामुळे मूळ प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता आणि त्या महिलेची हत्या कोणी व का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
तपासासमोर अनेक अनुत्तरित प्रश्न
या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर SDPO संतोष खाडे यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. घटनास्थळापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशची सीमा असल्याने तपासाची व्याप्ती दोन राज्यांपर्यंत पोहोचली आहे. मृत महिला मध्य प्रदेशातील आहे की इतर कोणत्या भागातील, याचा शोध घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.
तसेच, मृतदेहाची ओळख लपविण्यासाठी मुंडके आणि धड वेगळे करण्यात आले का, मृतदेह मध्य प्रदेशातून आणून येथे टाकण्यात आला की हत्या याच परिसरात झाली, याचाही तपास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केलेल्या संशयितांचा या हत्येशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याचाही फेरतपास होण्याची शक्यता आहे.
राज्याचे लक्ष ‘सर कटी लाश’ प्रकरणाकडे
शिवानी कलमेकर जिवंत असल्याचे उघड झाल्यानंतर ‘सर कटी लाश’ प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख निश्चित करताना कोणत्या पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या गूढ हत्येचा खरा उलगडा करून मृत महिलेची ओळख पटविणे आणि वास्तविक आरोपींपर्यंत पोहोचणे, हेच आता तपास यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.