मध्यरात्री विवाहितेचे घरातून अपहरण; हात-पाय बांधून टिनशेडमध्ये डांबले...खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटनेने उडाली खळबळ!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात १४ जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली. विवाहिता घरी झोपल्या असताना दोन जणांनी घराच्या दरवाजावर थाप मारली. त्यांनी दरवाजा उघडताच आरोपींनी त्यांचे तोंड दाबले आणि घराच्या मागील बाजूस नेले. त्यानंतर हात-पाय बांधून त्यांचे कथित अपहरण करण्यात आले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना शेतातील एका टिनशेडमध्ये नेले. तेथे डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली. यावेळी एका आरोपीने त्यांच्या डोक्यावरील केस कापल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी विवाहितेला हात-पाय बांधलेल्या अवस्थेत टिनशेडमध्ये बंदिस्त करून बाहेरून कुलूप लावले आणि घटनास्थळावरून पलायन केले.
या धक्कादायक प्रकरणानंतर हिवरखेड पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी हे कृत्य कोणत्या हेतूने केले, त्यामागील नेमके कारण काय आणि त्यांचा पीडितेशी काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.या प्रकारामुळे हिवरखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.