मंठा तालुक्याच्या तहसीलदार सोनाली जोंधळे यांची धडाकेबाज कारवाई ! लोणार तालुक्याच्या हद्दीमध्ये अवैद्य रेती वाहन पकडत केला गुन्हा दाखल ... 

 
लोणार (बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा): मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्याच्या तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी विदर्भातील लोणार तालुक्याच्या हद्दीमध्ये अवैद्य रेती वाहतूक करणारे वाहन पकडून कारवाई करत गुन्हे दाखल केल्याने रेती माफियांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्याचा विषय चर्चेचा झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मराठवाड्यातून दररोज अंदाजे ५० वाहने हे दिवसरात्र अवैद्य रेती वाहतूक करीत सीमा ओलांडून विदर्भातील लोणार तालुक्यात घुसतात. अवैद्य रेती उपसा आणि वाहतुकीमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याने याला पायबंद घालण्यासाठी मंठा तहसीलच्या तहसीलदार सोनाली जोंधळे ह्या एक्शन मोड आल्या आहेत. त्यांनी नियोजनबद्ध रेती माफियांवर कारवाई चा धडाका लावला असल्याचे दिसून येत आहे.
१९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे, तलाठी नितीन चिंचोले, पुरवठा विभागातील कर्मचारी सचिन कळणे हे अवैद्य रेती वाहतूक रोखण्यासाठी खाजगी वाहनाने तळणी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना विदर्भातील लोणार कडे विना वाहन क्रमांक असलेले पिवळ्या रंगाचे टिप्पर भरधाव वेगात जात असल्याचे दिसून आले. सदर वाहन थांबविण्यासाठी त्यांनी इशारा केला. मात्र ते वाहन लोणार च्या दिशेने सुसाट वेगाने पळून गेले.
सदरील वाहनाचा पाठलाग केला असता ते वाहन लोणार तहसिल हद्दीतील हॉटेल तुळजाई समोर पकडले. त्या विना वाहन क्रमांक असलेल्या पिवळ्या रंगाच्या वाहनावरील चालक संतोष देविदास चंदनपाट याला रेती वाहतुकी बाबत विचारणा केली असता. त्याच्याकडे रेती वाहतुकी बाबत कुठलाही परवाना आढळून आला नाही. दरम्यान त्याचवेळी तळणी येथील अर्चना बालासाहेब राऊत यांनी सदर महसूल पथकास सरकारी कामात अटकाव केला.
या संदर्भात मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी लोणार पोलिस स्टेशन ला कळवून सदर वाहन लोणार पोलिस स्टेशनच्या ताब्यात देत फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून लोणार पोलिस स्टेशनला अपराध क्रमांक ६१ / २४ नुसार कलम ३७९ /१८६ भां.द.वी. सहकलम ३, ४, गौणखनिज अधिनियम १९५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनखाली पोहेकॉ गजानन सानप, पोकॉ तेजराव भोकरे करीत आहेत.
 मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या धडाकेबाज कारवाई चे सर्वत्र कौतुक होत असून एखाद्या अधिकाऱ्याच्या मनात आले तर कार्यक्षेत्राच्या बाहेर सुद्धा जाऊन अवैद्य रेती वाहनावर कारवाई करता येऊ शकते. हे या कारवाई वरून सिद्ध होत आहे. सदर धडक कारवाई मुळे अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
मंठा तहसीलदार यांनी लोणार हद्दीत येऊन रेती वाहनावर कारवाई केल्याने लोणार तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. शहरातून दिवस रात्र रेती वाहने भरधाव वेगाने जात असतांना कोणतीही कारवाई होत नाही. मराठवाड्यातील मंठा तालुक्यातील तहसीलदार सोनाली जोंधळे ह्या महिला अधिकारी विदर्भातील लोणार तालुक्यात येऊन कारवाई करत लोणार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करतात. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरही त्याच रात्री आणि दुसऱ्या दिवशीहि राजरोसपणे दिवस रात्र रेतीचे वाहने लोणार शहरातून भरधाव जातात. यावरून रेती माफियांवर स्थानिक प्रशासनाचा एकतर धाक राहिला नसल्याचे दिसून येते किंवा गावातील चर्चे नुसार रेती माफियांवर स्थानिक प्रशासन कारवाईच करू शकत नाही, हे असू शकते. सदरील कारवाई वरून स्थानिक प्रशासनाची भूमिका तटस्थ का हा विषय सर्वत्र चर्चिला जात आहे.