अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास! 
पीडितेला अडीच हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश! धाड पोलिस स्टेशन हद्दीत घडली होती घटना ..

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या ५० वर्षीय आरोपीस बुलडाणा न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि चार हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दिनकर चोखाराम काकडे असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव असून, दंड न भरल्यास त्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तसेच, पीडित मुलीस अडीच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.

ही घटना नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली होती. पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत शेतात गेली असताना, दुपारी दीड ते दोन वाजेदरम्यान दिनकर काकडे याने तिला एकटी पाहून अश्लील वर्तन केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर २० नोव्हेंबर २०१९ रोजी पीडितेने धाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO Act) तसेच संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रकरणाची सुनावणी बुलडाणा येथील विशेष न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, पंच, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट डॉ. डी.सी. वायाळ आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश अपसुंदे यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. वादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.
प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी कोर्ट पैरवीचे काम पीएसआय रमेश चव्हाण यांनी पार पाडले. शेवटी, गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि दंडासह पीडितेस नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाने आदेशित केले.