शेती विक्रीच्या नावाखाली एकाची तब्बल १७ लाखांनी फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल; खोट्या केसेसची धमकीही दिली, आरोपी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथील
गणेश तुकाराम काकड (वय ३४, रा. गारगुंडी, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी संगनमत करून आंतरवली सराठी शिवारातील गट क्रमांक १०६ मधील ७० आर शेती विक्रीचा सौदा असल्याचे सांगत फिर्यादीकडून १७ लाख रुपये घेतले; मात्र प्रत्यक्षात सदर शेती विक्री न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी केवळ पैसेच घेतले नाहीत, तर पैसे परत मागितल्यास खोट्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस दाखल करण्याची धमकी दिली. तसेच “पैसे मागितले तर पाहून घेऊ” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोपही फिर्यादीने आपल्या लेखी तक्रारीत केला आहे. ही घटना ८ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर गुन्हा ३० डिसेंबर २०२५ रोजी नोंदविण्यात आला.या प्रकरणी गणेश काकड यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीसांनी वर्षा गणेश काकड, वाल्मीक मारोती सांगळे, सागरबाई वाल्मीक सांगळे, सचिन वाल्मीक सांगळे (सर्व रा. अंतरवली राठी, ता. घनसावंगी, जि. जालना) यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या पत्रानुसार व परवानगीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार माधव कुटे यांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मदतनीस पोलीस उपनिरीक्षक परवीन पटेल करत आहेत. सदर प्रकरणात शेती व्यवहार, आर्थिक व्यवहार व धमक्यांबाबत तपास सुरू असून, तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेती व्यवहारातील फसवणुकीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे.