अंत्यविधीसाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; भरधाव कारची दुचाकीला धडक; अंबाशी फाट्याजवळ घडला अपघात...

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली-मेहकर रस्त्यावर अंबाशी फाट्याजवळ २२ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे दीड वाजता झालेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राम सुरेश राठोड (रा. सावतबारा देवारी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम राठोड हे एमएच २०-एचएम १३२९ क्रमांकाच्या दुचाकीने सावतबारा देवारी येथून मांडवा येथे अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान, अंबाशी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एमएच ३७-जी ४८३७ क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की राठोड यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच एएसआय राजेंद्र काळे, अमोल गवई आणि सुनील राजपूत या पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.