पिंपरी सरहद्दीत युवकाची निर्घृण हत्या; अपघाताचा बनाव उघडकीस
जुन्या वादातून खून केल्याचा आरोप; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एक आरोपी मेहकर तालुक्यातील...

 
 डोणगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील उकीरखेडा येथील २४ वर्षीय युवकाची पिंपरी सरहद्द (ता. मालेगाव) येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून युवकाचा खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मृत युवकाचे नाव अभिषेक विष्णू वाघ (वय २४, रा. उकीरखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम) असे आहे. या प्रकरणी त्याचे वडील विष्णू गोविंदा वाघ (वय ४९)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आनंद विनोद मवाळ, प्रतिक संतोष हुंबाड, पवन गजानन दांदडे (सर्व रा. महागाव, ता. रिसोड, जि. वाशीम)तसेच शुभम शेषराव अवचार (रा. अंजनी बुद्रूक, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १८ जून रोजी सायंकाळी अभिषेक वाघ याला जेवणासाठी बाहेर जाण्याचे सांगून पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ नेण्यात आले. तेथे जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्यावर जड हत्याराने डोक्याच्या मागील बाजूस वार करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयितांनी हा प्रकार अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

 तीन वर्षांपूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी

मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी पैशांच्या व्यवहारावरून संबंधित आरोपींसोबत वाद झाला होता. तसेच महिनाभरापूर्वी कामावर येण्याच्या कारणावरून अभिषेकला धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याच जुन्या रागातून कट रचून हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

आरोपी पोलीस ताब्यात

मेहकर-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादीमध्ये संशयितांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याने शिरपूर पोलिसांनी संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.