शेतीच्या जुन्या वादातून अंढेरा येथे तरुणावर चाकूने हल्ला महिलेलाही मारहाण; नऊ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

 
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत शेतीच्या जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक चाकूहल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर स्वरूपाचे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात 👆🏻
याप्रकरणी सरला भिकाजी केवट (वय ४८), व्यवसाय शेती, रा. अंढेरा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी व मोतीराम भाऊसिंग दधरे यांच्यात शेतीसंबंधी वाद असून तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान, १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा अजय हा घरासमोरील गल्लीत उभा असताना आरोपी सतीश पिछोरे याने कोणतेही कारण नसताना त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत जाब विचारताच आरोपीने चाकूने अजयच्या उजव्या कानावर वार करून गंभीर जखमी केले, असे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी महिला घरी असताना आरोपी सतीश पिछोरे याने पुन्हा अश्लील शिवीगाळ सुरू केली. यावेळी फिर्यादीने परवा मुलावर चाकूने हल्ला केल्याबाबत जाब विचारल्यावर, आरोपीने चापट व बुक्क्यांनी मारहाण करत तिची साडी ओढली, केस धरून खाली पाडले.
भांडण सोडविण्यासाठी मुलगा अजय मध्ये पडताच आरोपीने त्याच्यावर पुन्हा चाकूने वार केला. त्यानंतर आरोपी सतीशच्या घरातून रतिराम दधरे, नारायण दधरे, सविता दधरे, कविता दधरे, लता सुनकरे, जानकाबाई पिछोरे व सविता पिछोरे हे बाहेर येऊन त्यांनीही फिर्यादी व तिच्या मुलास शिवीगाळ करत जीवाने मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे अंढेरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २९६, १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ३५१(२), ३५२ व ११५(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.