पेट्रोलपंपातून ५.५६ लाखांची चोरी करणारा गोंदियातून अटकेत; देऊळगाव राजा पोलिसांची धडक कारवाई!

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आळंद गावातील एका पेट्रोलपंपातून तब्बल ५ लाख ५६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पसार झालेल्या आरोपीस देऊळगाव राजा पोलिसांनी गोंदियातून अटक करत मोठे यश मिळवले आहे. ही घटना १६ जून २०२५ रोजी घडली होती.

या प्रकरणी पेट्रोलपंप चालक नरहरी शिवाजी खार्डे यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासासाठी महिला पोलिस उपनिरीक्षक कांचन जारवाल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. पोलिस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी करण संतोष हिवाळे (रा. बुलढाणा) हा गोंदिया येथे असल्याचा सुगावा लागला. त्यानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई, कॉन्स्टेबल प्रवीण डोईफोडे व विनोद चव्हाण यांच्या पथकाने गोंदियात धाड टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून ३,३५,६७० रुपये रोख व १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक कांचन जारवाल, सहायक फौजदार प्रमोद मुळे आणि कॉन्स्टेबल प्रवीण डोईफोडे करीत असून, आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या वेगवान व अचूक कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.