गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर मलकापूर पोलिसांची धडक कारवाई; मालवाहू वाहनासह १५ लाखांचा ऐवज केला जप्त..!
Sep 12, 2025, 11:34 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुटख्याची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर मलकापूर पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी धडक कारवाई करीत दोघांना अटक केली.ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील हॉटेल यादगारजवळ करीत पोलिसांनी मालवाहू वाहनासह तब्बल १५ लाख २४ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक सुरू असल्याने पोलिसांनी महामार्गावर सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाचे बोलेरो पीकअप (क्र. एमएच ४८ एवाय ५१७३) संशयास्पदरीत्या येताना दिसले. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा सदृश माल आढळून आला. वाहनासह तुषार गजानन लोहटे (२०, रा. रिसोड, जि. वाशिम) व विनोद सागर घुगे (२०, रा. रिसोड, जि. वाशिम) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहन तपासणीदरम्यान
केसरयुक्त विमल पान मसाला – ३,२९,००० रु., व्ही सुगंधित तंबाखू – १८,००० रु., केसरयुक्त विमल पान मसाला (इतर पॅकेज) – १,९५,००० रु., कीर सुगंधित नोनु – ३१,२०० रु., प्रिमियम राज निवास पान मसाला – ३,१५,००० रु., प्रिमियम आर.एन. सुगंधित तंबाखू – ८०,३२५ रु.,
पानबहार पान मसाला – ५६,२५० रु. आणि बोलेरो पिकअप वाहन किंमत ५,००,००० रु. असा एकूण १५,२४,७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता बसावे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश गिरी, सपोनि गजानन कौळासे, पोहेका शाम कपले, पोहेका यशवंत पाटील, पोका आसिफ शेख व पोका आनंद माने यांनी केली.