मलकापूरच्या युवतीचा मुंबईत अपघाती मृत्यू; फेब्रुवारीत होणार होतं लग्न; पण काळाने घातली झडप...
Nov 8, 2025, 19:50 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर शहरातील एका हुशार आणि प्रतिभावान युवतीचा मुंबईत झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खुशबू दीपक परयाणी (वय २७) असे मृत युवतीचे नाव असून, ती आयसीआयसीआय बँकेच्या मुंबई शाखेत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी खुशबू आपल्या नेहमीच्या प्रमाणे कार्यालयात जात असताना, बिकेशी परिसरातील एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ रस्ता ओलांडत असताना तिला भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली.
या धडकेत ती गंभीर जखमी झाली. सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, खुशबूचा विवाह १२ फेब्रुवारी रोजी होणार होता. भावी आयुष्याची सुंदर स्वप्नं रंगवत असतानाच नियतीने तिच्यावर काळाचा घाला घातला. या दुर्घटनेने मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
खुशबू ही मलकापूर शहरातील प्रतिष्ठित समाजसेवक व व्यापारी ताराचंद परयाणी यांचे बंधू दीपक परयाणी यांची मुलगी होती. तिच्या निधनाने परयाणी कुटुंबासह परिचित व व्यावसायिक वर्तुळात दुःखाचे सावट पसरले आहे. तिच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण, काका आणि आप्तस्वकीय असा परिवार आहे.