करामती चोरटा! गाडीच्या डिक्कीतून ८५ हजार चोरले, लोकांनी पाठलाग केल्यावर ३२ हजार रस्त्यावर फेकले; खामगावची घटना

​​​​​​​

 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावच्या फरशी भागातील दुकानावरून पुजेचे साहित्य घेत असलेल्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून ८५ हजार रूपये लंपास करीत असल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यामुळे नागरिकांनी सदर चोरट्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी त्याने पळ काढला. नागरिक पाठलाग करीत असल्याचे पाहून त्याने काही रक्कम रस्त्यावर टाकून आणखी धूम ठोकली. ही घटना १० जुलै रोजी घडली. 

खामगावच्या नटराज गार्डन भागातील पवन शर्मा यांनी सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बँकेतून ८५ हजार रूपये काढून ती रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. पुजेचे साहित्य घेण्यासाठी ते फरशीवरील एका दुकानावर आले. त्या दुकानासमोर त्यांनी दुचाकी उभी केली परंतु त्यांनी सदर दुचाकीला चाबी तशीच ठेवून दिली. ही संधी साधून त्यांच्यावर नजर ठेवलेल्या चोरट्याने  चाबीने डिक्की उघडून त्यामधील ८५ हजार रूपयांची रोख काढून पोबारा केला. परंतु हा प्रकार नागरिक व शर्मा यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर चोरट्या तरुणाचा पाठलाग केला. 

त्यामुळे नागरिकांना चकमा देण्यासाठी त्याने या पैशातील काही रक्कम रस्त्यावर फेकून त्याने सर्व पैसे टाकून दिले, असे समजून नागरिकांनी त्याचा पाठलाग थांबवून दिला. परंतु शर्मा यांनी चोरट्याने रस्त्यावर टाकलेली रक्कम मोजली असता ती ३२ हजारच भरली. त्यामुळे ५३ हजार रूपये घेवून त्याने पोबारा केल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
याबाबत खामगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच डीबी पथकाने घटनास्थळी दाखल होवून चोरट्याचा शोध सुरू केला होता.