प्रेम, संशय आणि रक्तरंजित शेवट; १६ वर्षीय संस्कृतीच्या खुनाचा तपास पूर्ण;चारित्र्याच्या संशयातून थरारक हत्या; दुसरबीडचा युवक निघाला आरोपी, पोलिसांनी केले गजाआड...
Updated: Feb 23, 2026, 15:35 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील सारूळ शिवारात अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या बुलढाण्यातील १६ वर्षीय संस्कृती काळे हिच्या खुनाचा उलगडा करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी अथर्व गजानन देशमुख (वय १९, रा. दुसरबीड, ता. सिंदखेड राजा) आणि सुमित देवानंद सानप यांना अटक करण्यात आली आहे.
२० फेब्रुवारी रोजी सारूळ (जि. नाशिक) परिसरात अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी ठोस पुरावे नसताना पोलिसांनी राज्यभरातील बेपत्ता मुलींची माहिती तपासली. त्यातून अकोला येथील संस्कृती काळे बेपत्ता असल्याची नोंद आढळली. कुटुंबीयांनी अथर्व देशमुखवर संशय व्यक्त केल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट झाली.
तपासादरम्यान पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरातून अथर्वला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या कबुलीनुसार, संस्कृतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये संशय निर्माण झाल्याने रागाच्या भरात तिला कारमध्ये नेत मानेवर चाकूने वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली. मृतदेह वाडीवडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेकण्यात आला होता.
या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.