सोशल मिडीयावरील जाहिरातीच्या नादी लागून गमावले ३० लाख! चिखलीतील शिक्षकाला पश्चाताप...  

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सोशल मिडीयावरील कित्येक फसव्या जाहिरातीमुळे उच्चशिक्षीत माणूस देखील लालाईत होवून फसवणुकीचा बळी ठरला आहे. अशीच एक घटना चिखलीतून समोर आली आहे. कमी कालावधीत जास्त नफा मिळविण्याच्या नादात एका शिक्षकाची ३० लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक झाली. या प्रकरणी बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, १४ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षकाच्या मोबाइलवर नोटिफिकेशन आले. ज्यामध्ये इंडिया एसएम स्टेनली कंपनी हा व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी लगेच हा ग्रुप जॉइन केला. ग्रुपवर सुरुवातीला कोणते शेअर घ्यायचे व
केव्हा विकायचे या संदर्भात माहिती दिली जायची व दिलेल्या शेअरच्या किमती वाढून नफा झाल्यामुळे त्यांचा त्यावर विश्वास बसला. अधिक नफा मिळवण्यासाठी १४ एप्रिल २०२४ पासून त्यांना स्पेशल अकाउंट देण्यात आले. त्यासाठी कंपनीने शिक्षकाला गुगलप्ले स्टोअरवरून एमजीएसएल- पीआरओ नावाचे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले व त्या ॲपवरून शेअरची ट्रेडिंग सुरू झाली. त्यात स्पेशल अकाउंटच्या माध्यमातून अधिक पैसा मिळाल्याबाबत दाखवण्यात आले. या अकाउंटचे बरेचसे फायदे शिक्षकाला सांगण्यात आले होते. त्यांना माहिती देण्याकरिता एक व्यक्ती त्यांना व्हाट्सअपवर चॅटिंग करून शिक्षकाला शेअर्ससंदर्भात सूचना देत असे. तसेच अन्य एक व्यक्ती व्हॉट्सअप चॅटिंग करायची आणि एमजीएस प्रो ॲपमध्ये ओटीसी ट्रेनिंगमध्ये शेअर आहे, डिस्काउंट प्राइजमध्ये उपलब्ध असतात आणि जितकी गुंतवणूक जास्त तितका डिस्काउंट त्याप्रमाणे प्रमाणात अधिक मिळत होता, त्यामुळे शिक्षकाने अधिकाधिक गुंतवणूक केली. सदर अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात कस्टमर केअर मोबाइल नंबर तसेच संबंधित लोकांच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून शिक्षकाला मेसेज येत होते व ते पैसे भरण्याकरिता नेहमी वेगवेगळे अकाउंट नंबर त्यांना द्यायचे, ज्यामध्ये त्यांनी डिस्काउंट स्टॉक, आयपीओ शेअर घेण्याकरिता ऑनलाइन, आयएमपीसी, आरटीजीएस असे त्यांच्या खात्यातून जवळपास ३० लाख ३० हजार रुपये त्यांनी सांगितलेल्या अकाउंट नंबरवर पाठवले. प्रसार माध्यमांवर फसवणुकीच्या बातम्या पाहून उशिरा का होईना शिक्षकाचे डोळे उघडले. त्यानंतर त्यांनी बुलढाणा सायबर पोलिसांत तक्रार दिली. यावरून सोशल मीडियावर भामटेगिरी करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.