वझर आघाव परिसरात बिबट्याची दहशत; वासराची शिकार, शेतकऱ्यांसमोरच मक्याच्या शेतात पलायन...

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील वझर आघाव परिसरात बिबट्याने उघडपणे हल्ला चढवत वासराची शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वझर आघाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात गहू काढण्याचे काम मशीनद्वारे सुरू होते. याच दरम्यान शेतात एक वासरू मृत अवस्थेत आढळून आले. जवळ जाऊन पाहणी केली असता वासराची बिबट्याने शिकार केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान, शेतकऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता काही अंतरावर दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. अचानक समोर बिबट्या दिसताच शेतकऱ्यांनी आरडाओरड करत गोंधळ घातला. आवाज होताच बिबट्याने क्षणातच तेथून धूम ठोकत जवळील मक्याच्या शेतात आश्रय घेतला.
या घटनेनंतर घाबरलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. मात्र वृत्त लिहीपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
सध्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे सावट पसरले असून शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, जनावरांची विशेष काळजी घ्यावी आणि बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.