घरातून निघाला अन् दुसऱ्याच दिवशी विहिरीत तरंगताना सापडला मृतदेह! २४ वर्षीय युवकाच्या मृत्यूने दसरखेड हादरले...

 
मलकापूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडलेल्या २४ वर्षीय युवकाचा दुसऱ्याच दिवशी शेतातील विहिरीत मृतदेह आढळल्याने दसरखेड परिसरात खळबळ उडाली आहे. हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत हा धक्कादायक शेवट समोर आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

मृत युवकाचे नाव राहुल मधुकर नरोटे (वय २४, रा. दसरखेड, ता. मलकापूर) असे आहे. तो एमआयडीसी परिसरातील बॅन्जो कंपनीमध्ये नोकरी करत होता. राहुलचा मोठा भाऊ चिंतामण मधुकर नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजता राहुल कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नसल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, १९ जुलै रोजी दसरखेड येथील गोविंदराव वामनराव डोसे यांच्या शेतातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती गावकऱ्यांनी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर चिंतामण नरोटे आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील मृतदेह राहुलचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मर्ग क्रमांक ११/२०२६ कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. राहुलच्या अकाली मृत्यूमुळे दसरखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.